Romans 16

पौलाचा मित्रमंडळीला सलाम

1आता, किंख्रिया शहरातील असलेल्या मंडळीची सेविका, आपली बहीण फिबी हिची मी तुम्हास शिफारस करतो की, 2तुम्ही पवित्र जनांस शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे साहाय्यक व्हा; कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही साहाय्यक झाली आहे.

3ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार-कामकरी प्रिस्का व अक्विला ह्यांना सलाम द्या. 4यांनी माझ्या जिवासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि मीच एकटा त्यांचे उपकार मानतो असे नाही, पण परराष्ट्रीयातील सर्व मंडळ्या त्यांचे उपकार मानतात. 5त्याचप्रमाणे, त्यांच्या घरात जमणार्‍या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या; तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथमफळ आहे.

6मरीयेला सलाम द्या; तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत;

7माझे आप्त व जोडीदार-बंदिवान अंद्रोनिकस व युनिया ह्यांना सलाम द्या; प्रेषितांत त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्ताचे झाले होते. 8प्रभूमध्ये माझा प्रिय अंप्लियात ह्याला सलाम द्या.

9ख्रिस्तात आमचा जोडीदार-कामकरी उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम द्या.

10ख्रिस्तात स्वीकृत अपिल्लेस ह्याला सलाम द्या. अरिस्तबूलच्या घरातल्यांना सलाम द्या. 11माझा आप्त हेरोदियोन ह्याला सलाम द्या. नार्कीसच्या घरचे जे प्रभूत आहेत त्यांना सलाम द्या.

12प्रभूमध्ये श्रम करणार्‍या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत. 13प्रभूमध्ये निवडलेला रुफस व त्याची आई ह्यांनाही सलाम द्या. ती मला आई समान आहे. 14असुंक्रित, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास ह्यांना व त्यांच्याबरोबर राहणार्‍या बांधवांना सलाम द्या.

15फिललोगस, युलिया, निरीयस व त्याची बहीण आणि ओलुंपास ह्यांना सलाम द्या आणि त्यांच्याबरोबर राहणार्‍या सर्व पवित्र जनांस सलाम द्या. 16पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम पाठवत आहेत.

फुटी करणाऱ्यांसंबंधी इशारा

17आता, बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा. 18कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;

19कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे. 20आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.

निरनिराळ्या जणांचा सलाम

21माझा जोडीदार-कामकरी तीमथ्य आणि माझे आप्त लुकियस, यासोन व सोसिपेतर हे तुम्हास सलाम पाठवतात. 22हे पत्र ज्याने लिहिले आहे तो तर्तियस तुम्हास प्रभूमध्ये सलाम पाठवत आहे.

23माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हास सलाम पाठवतात. 24
This verse is empty because in this translation its contents have been moved to form part of verse Rom 16:25.
In this translation, this verse contains text which in some other translations appears in verses Rom 16:24-Rom 16:25.
25आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे रहस्य मागील युगात गुप्त ठेवण्यात आले, 26पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हास स्थिर करण्यास समर्थ आहे, 27त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.

Copyright information for MarULB